Nivad : लोणी भापकरच्या प्रतिक गडदेची जिद्द ठरली यशस्वी,` सलग दुसऱ्यांदा पोलीस दलात निवड !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7  प्रतिनिधी  : 
बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावचा सुपुत्र कु. प्रतिक अर्जुन गडदे याने आपल्या जिद्दीच्या जोरावर पुन्हा एकदा यशाचे शिखर गाठले आहे. सध्या मुंबई येथील SRPF गोरेगाव येथे कार्यरत असलेल्या प्रतिकची पुणे शहर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली आहे. अवघ्या 23 व्या वर्षी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र पोलीस दलात निवड होणे ही अत्यंत अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.
प्रतिक गडदे यांचे वडील अर्जुन गडदे हे शेती काम करत असून, आई वैशाली गडदे आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. घरची परिस्थिती गरीब असतानाही कुटुंबाने कष्ट आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारत प्रतिकच्या शिक्षणाला व स्वप्नांना पाठबळ दिले.
आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत प्रतिक याने शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.
SRPF मध्ये कार्यरत असतानाही त्यांनी आपले ध्येय कायम डोळ्यासमोर ठेवले. नोकरीसोबत अभ्यास, शारीरिक तयारी आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच आज त्याला पुणे शहर पोलीस दलात स्थान मिळाले आहे.
प्रतिक याचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर लोणी भापकर गाव, बारामती तालुका आणि संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्याच्या या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असून, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळते,”  हा संदेश त्यानी आपल्या कृतीतून दिला आहे.
प्रतिक यांच्या या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे अथक कष्ट आणि त्याग दडलेला आहे. शेतात राबणारे वडील आणि गावोगावी आणि वाड्या- वस्त्यावर फिरून आरोग्य सेवा देणारी आई, यांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. अनेक वेळा परिस्थिती कठीण झाली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही.
आज मुलाच्या यशाने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले असून, “आपल्या मुलाने गणवेश घालून समाजाची सेवा करावी,” हे स्वप्न पूर्ण झाल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
प्रतिक गडदे याचा हा संघर्षमय प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरत असून, कष्ट, जिद्द आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
.........
To Top