शेअर ट्रेडिंगमधून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करण्याचा प्रयत्न उधळून लावत बारामती शहर पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटांत ५० हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली. पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
इंदापूर चौक परिसरातील सिनेमा रोडवरील नगरपरिषद गाळा क्रमांक १ मध्ये असलेल्या ‘युनिक मोबाईल शॉपी’ येथे ही घटना घडली. अभिमन्यू (मुन्ना) शिंदे व अरबाज तांबोळी हे येथे मोबाईल दुरुस्ती, अॅक्सेसरीज विक्री व अधिकृत मनी ट्रान्सफरचा व्यवसाय करतात.
शुक्रवारी दुपारी एका तरुणाने आपल्या वडिलांसह दुकानात येऊन १ लाख ६० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची विनंती केली. त्यानुसार सुरुवातीला ५० हजार रुपये संबंधित खात्यावर वर्ग करण्यात आले. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्याबाबत त्या तरुणाने शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेळकाढूपणा सुरू केला.
दरम्यान, संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित तरुण व त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते मुनिर तांबोळी यांच्या मदतीने प्रकरण बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी संबंधित तरुणाची सखोल चौकशी करून त्याला कायदेशीर परिणामांची जाणीव करून दिली. तसेच त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत ५० हजार रुपयांची रक्कम संबंधित दुकानदाराच्या खात्यात परत जमा करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव यांच्यासह अमीर शेख, महेश माने, बाजीराव गर्जे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या घटनेमुळे पोलिसांची तत्परता व कार्यक्षमता अधोरेखित झाली असून नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

