लोणी भापकर, (ता.बारामती) येथे श्री. राम मंदिरात राम नवमीच्या पवित्र पर्वानिमित्त व मुर्ती प्रतिस्थापनेला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तपपुर्ती सोहळ्याचे आयोजन भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा, अभिषेक, आरती तसेच रामनाम जपाचे आयोजन करण्यात आले.
दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा बालयोगी पांडुरंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व ह. भ. प. प्रमोद महाराज शिंदे, वडापुरी ता. इंदापूर यांच्या कीर्तनाने पार पडला. यावेळी शंखनाद, घंटानाद आणि फुलांची उधळण करत ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थित भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते.
तसेच या निमित्ताने ढोल- ताशा झांज- पथक अशा वाद्य समुदायाने पालखी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवक, ज्येष्ठ पुरुष मंडळी आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. काही दानशूर व्यक्तींच्या वतीने फुलांची सजावट करण्यात आली. गणेश भापकर व सुनील बारवकर (लोणी भापकर ) यांच्या वतीने महाप्रसाद (अन्नदान ) व सचिन भापकर (सायंबाचीवाडी) यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजक म्हणून भैरवनाथ भजनी मंडळाने उत्कृष्ट पद्धतीने काम पहिले. तर संपूर्ण कार्यक्रमात निवेदनाची जबाबदारी नानासाहेब बारवकर यांनी समर्थपणे पार पाडली . बारामती तालुक्यातून आलेल्या भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी सढळ हाताने मदत केली. तरुण वर्गानेही अन्नदानाच्या पंगती वाढण्याचे काम मोठ्या श्रद्धेने आणि भक्ती भावाने केले.
राम नवमी हा सण प्रभू श्रीराम यांच्या आदर्श जीवनाची प्रेरणा देणारा असून समाजात एकता आणि सद्भावना वाढवण्याचा संदेश देतो असे मत बालयोगी पांडुरंग महाराज यांनी उपस्थित भक्तांचे आभार मानताना व्यक्त केले. उपस्थित नागरिकांनीही शांतता आणि शिस्त राखून कार्यक्रम साजरा केला.
.....

