Kalsharohan : "लोणी भापकर`ला विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा भक्ती -भावात संपन्न" !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी : 
लोणी भापकर (ता. बारामती ) येथे  गावचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी  मंदिराच्या कळसाचे विधिवत पूजन करून कलशारोहण सोहळा अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
 ग्रामस्थ, देणगीदार आणि मंदिर समिती यांच्या सहकार्याने साकारलेले हे भव्य मंदिर काम पूर्ण झाल्यानंतरही अनेक वर्ष कळस बसला नसल्याने अनेक भाविक -भक्तांनी व विशेष करून भैरवनाथ भजनी मंडळाने आणि विश्वस्त कमिटीने कळस बसवण्याचा निर्णय हाती घेतला. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  कलशारोहन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मंदिरावर आकर्षक फुलांची आरास, विद्युत रोषणाई आणि पारंपरिक तोरणांनी मंदिर सजविण्यात आल्याने  संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

सोहळ्याची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली. त्यानंतर वेदपाठनाच्या मंत्रोच्चारात गणेशपूजन, कलशपूजन, हवन व महाअभिषेक करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात श्री. बालयोगी पांडुरंग महाराज यांच्या हस्ते सुवर्णकलश मंदिराच्या शिखरावर प्रतिष्ठापित करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोशात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या प्रसंगी विठ्ठल-  रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री विकास बारवकर यांच्या हस्ते, पंचायत समितीचे माजी सदस्य, गावातील आजी- माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, या कामासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे, भजनी मंडळातील सदस्यांचे व भाविक भक्तांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री.नानासो बारवकर यांनी आपल्या भाषणात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे कौतुक केले व धार्मिक एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे, देणगीदारांचे, स्वयंसेवकांचे व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. 
या भव्य कलशारोहण सोहळ्यामुळे गावात धार्मिक व सामाजिक एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

.......



To Top