बारामती तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एलसी कंपनी लेक परिसरात प्रेयसीसोबत बसलेल्या तरुणावर अज्ञातांनी कोयत्याने हल्ला करून त्याच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजारांचा ऐवज लुटून नेला.
या घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासाअंती तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि.२६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (बदलेले नाव) (मूळ रा. नागपूर वय २६, हल्ली बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्याजवळ येत लोखंडी सत्तूर, कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले.
त्यानंतर आरोपींनी सोन्याची सुमारे २१ ग्रॅम वजनाची चैन (किंमत ३ लाख रुपये), चांदीची अंगठी (५ हजार रुपये), चांदीची चैन (१५ हजार रुपये), आणखी एक चांदीची अंगठी ८२ हजार रुपये) व २ हजार रुपये रोख असा τ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला व 'परत इकडे यायचं नाही' अशी धमकी देत तेथून पसार झाले. या प्रकरणी बारामती तालुका
पोलीस ठाण्यात बी.एन.एस कलम ३०९ (६), ३(५) अन्वये दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी कसून चौकशी करत या प्रकरणातील आरोपी निष्पन्न केले.
त्यानुसार प्रसाद गणपत भोसले (वय २४) धैर्यशील प्रशांत आगवणे (वय १९) आणि कृष्णा नाना गाडेकर (वय २१, सर्व रा. तांदुळवाडी, ता. बारामती) यांना २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राजू बन्ने यांच्या पथकाने केली आहे.
...........

