बारामती-पारवडी रस्त्यावर बुधवारी (ता. 4) रात्री चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आई व पाच वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात वडील व दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चारचाकी वाहन चालकाने गाडी तेथेच सोडून पळ काढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अपघातानंतर रुपाली कोकणे व सानवी कोकणे यांना तातडीने रुग्णालयातदाखल करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
मयूर कोकणे हे आपली पत्नी रुपाली, पाच वर्षाची मुलगी सानवी व दोन वर्षांचा मुलगा कृष्णा यांच्यासह बारामतीहून पारवडीनजीक असलेल्या घरी दुचाकीवरुन निघाले होते. परीटवस्तीनजीक समोरुन चुकीच्या दिशेने आलेल्या मारुती व्हॅगनर (गाडी क्रमांक एमएच 42- बीजे 1404) या चार चाकी गाडीने त्यांना समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रुपाली कोकणे (वय 25) व सानवी कोकणे (वय 5) या मायलेकींचा मृत्यू झाला.
दरम्यान, दोन वर्षांच्या कृष्णा या मुलावर पुण्यातील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मयूर कोकणे यांनाही ब-याच ठिकाणी मार लागला असून त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बाबत सचिन शिवाजी कोकणे यांनी फिर्याद दिली असून हा अपघात नेमका कशामुळे झाला या बाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही. या अपघातानंतर संबंधित चारचाकीचा चालक गाडी घटनास्थळी सोडून पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

