“ZP Election : झेडपी कोणाला पावणार अन् अध्यक्षाची गाडी कोण घेऊन धावणार?” !

Vijay Golande
विजय गोलांडे, न्यूज स्टेट सेवन  :
मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७३ पैकी तब्बल ५१ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा सहज पार करत पक्षाने सत्तास्थापनेचा मार्ग  निश्चित केला असून  निवडून आलेल्या सदस्यापैकी “झेडपी कोणाला पावणार अन् अध्यक्षाची गाडी कोण घेऊन धावणार?” याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  
  
स्पष्ट बहुमतामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राष्ट्रवादीच्या हातात राहणार आहे. अध्यक्षपद खुले असल्याने पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये चुरस असली तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेतृत्वाच्या चर्चेनंतर होणार आहे.
  पक्षश्रेष्ठीं अनुभवी सदस्यांना संधी देणार की नवख्यांना संधी देणार  हा सध्या चर्चेचा विषय संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. अनुभवी सदस्यांचा विचार झाल्यास दौंडचे वीरधवल जगदाळे, मुळशीचे शांताराम इंगवले, आंबेगावचे  विवेक वळसे पाटील तर बारामती मधून करण खलाटे यांची नावे आघाडीवर आहेत.  तसेच शिरूरच्या माजी सभापती सुजाता पवार आणि भोरचे विक्रम खुटवड यांची नावे अचानक पुढे येण्याची  दाट शक्यता आहे.
 दुसरीकडे, नव्याने निवडून आलेल्या तरुण सदस्यांमध्ये इंदापूर मधून अंकिता पाटील व यशराज जगदाळे, पुरंदर मधून प्राजक्ता दुर्गाडे, दौंड मधून तुषार थोरात, खेड मधून सुनीता बुट्टे पाटील यांची नावे पुढे येत आहेत. नवख्या सदस्यांना संधी न मिळाल्यास त्यांची  एखाद्या महत्त्वाच्या समितीच्या सभापतिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

अध्यक्ष निवडीत  अनुभव, पक्षनिष्ठा आणि आगामी राजकीय समीकरणे या सर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था असल्याने नेतृत्व सक्षम आणि सर्वसमावेशक असावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी अध्यक्षपदासाठीची अंतर्गत स्पर्धा चुरशीची ठरणार असून अंतिम निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार जे नाव  सांगतील त्याच नावाची चिट्ठी बंद पाकिटातून  काढून त्याच नावाची अधिकृत घोषणा केली जात होती. परंतु आता त्याच धर्तीवर पक्षश्रेष्ठींना निर्णय घेणे जड जाणार आहे.
       पुढील प्रक्रिया
लवकरच विशेष सभेची अधिसूचना जाहीर होऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची औपचारिक निवड होईल. तोपर्यंत जिल्ह्यातील राजकीय हालचाली आणि इच्छुकांची लॉबिंग सुरू राहणार आहे.
.............
To Top