न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी :
बारामती- मोरगाव रस्त्यावरील माळवाडी (लोणी) येथे गतिरोधक तातडीने बसवावेत, अन्यथा ५ तारखेला सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा थेट आणि कडक इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या रस्त्यावर आतापर्यंत झालेल्या अपघातांत या गावातील चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असुन प्रशासन अद्याप निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस स्टेशन तसेच तहसीलदार, बारामती यांना लेखी निवेदन देण्यात आल्याची माहिती वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख दत्ता लोणकर व ग्रामस्थांनी दिली. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मागणीकडे दुर्लक्ष केल्यास उद्या ५ तारखेला सकाळी १० वाजता मोरगाव–बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल.
निवेदनात आणखी स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर येत्या ७ तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या यंत्रणेला मतदानाद्वारे जाब विचारला जाईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
भरधाव वाहने, अपुरा रस्ता आणि गतिरोधकांचा अभाव यामुळे शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध व पादचारी रोज मृत्यूच्या सावटाखाली वावरत आहेत. आता आश्वासनांवर विश्वास न ठेवता आरपारची लढाई छेडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
.........

