लोणी भापकर ता. बारामती येथील ग्रामसेविके विरोधात सुरू असलेले आंदोलन आज मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प. पुणे) यांच्या आश्वासनानंतर अखेर मागे घेतले आहे. दरम्यान प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना स्पष्ट केले आहे की,आचारसंहिता संपल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
लोणी भापकर ग्रामपंचायतिच्या ग्रामसेविका उज्वला शिंगाडे यांनी दमदाटी केल्याचा आरोप करून आंदोलनकर्ते मनोज साठे यांनी मागील काही दिवसांपासून शांततेतून आंदोलन चालवले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांनी स्पष्ट केले की पुढील कारवाईवर लक्ष ठेवले जाईल.
आंदोलनकर्त्यांचा इशारा ठाम आहे की चौकशी निष्पक्ष आणि त्वरित पार पडली पाहिजे, अन्यथा परिस्थिती पुन्हा तिव्र स्वरूप घेऊ शकते. प्रशासनाने आता नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी त्वरित स्पष्टता आणि जबाबदारी दाखवणे आवश्यक आहे.
याबाबत आंदोलनकर्ते मनोज साठे म्हणाले जनहितासाठी सुरू केलेल्या आपल्या धरणे आंदोलनाच्या मागण्यांना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, आज दिनांक 01/12/2025 रोजी, पासून आम्ही धरणे आंदोलनाला स्थगिती देत आहोत.
या लोकशाही लढ्यात निस्वार्थी पाठिंबा देणाऱ्या सर्व मान्यवर, ग्रामस्थ, मित्रपरिवार, तरुण मंडळी आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
आपला विश्वास, एकता आणि शांततापूर्ण पुढाकार यामुळेच हा लढा प्रभावीपणे पुढे नेऊ शकलो.
यावेळी आंदोलनकर्ते मनोज साठे, माजी सरपंच विजय बारवकर, उद्योजक संदीप पवार, सुनील बारवकर, बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष दादा कडाळे, सामाजिक कार्यकर्ते विशाल भापकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून घटनेची माहिती दिली व कारवाई करण्याचे आश्वासन घेतले.
...........

