electricity issue| विद्युत रोहित्र (डीपी) जळाल्याने शेतकरी त्रस्त तीन आठवड्यापासून वीजपुरवठा खंडित, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!


 लोणी भापकर : बारामती तालुक्यातील लोणी पाटी येथील विद्युत रोहित्र ( डीपी ) जळाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. अनेकवेळा मागणी करून सुद्धा वीज वितरण कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
                 तीन आठवड्यांपूर्वी येथील वीज वितरण केंद्राजवळील विद्युत रोहित्र (डीपी) जळाल्याने या परिसरातील शेतीचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनसुद्धा अद्याप नवीन डीपी बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटारी बंद असून पिकांना पाणी देता येत नाही. काही ठिकाणी पिके जळण्यास सुरुवात झाली आहे. तीन आठवडे झाले तरी आमच्या शेतात वीज नाही. पिके वाचवायची तर वीज आवश्यक आहे, पण कोणी ऐकत नाही असे  शेतकरी रोहिदास भापकर यांनी सांगितले. तसेच स्थानिक शेतकरी ज्ञानदेव लोणकर यांनी वीज वितरण कंपनीने तातडीने नवीन डीपी बसवून वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 याबाबत शाखा अभियंता  सागर शेलार यांच्याशी गेल्या तीन दिवसापासून  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान त्या भागात काम करणारे खाजगी  वायरमेन प्रमोद मदने म्हणाले दोन दिवसात विद्युत रोहित्र बसवण्यात येणार आहे.
.........
To Top