Diwali ! यंदा विठ्ठलाची भेट होणार नसल्याने राजकीय भक्त नाराज !

Vijay Golande




लोणी भापकर  : संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी बारामतीत येणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार  व त्यांचे कुटुंबीय घरातील दु:खद घटनेमुळे भेट देणार नसल्याने राजकीय नेते व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
 राजकीय पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीत दरवर्षी दिवाळीतील पाडव्यानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीसह राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असतात. परंतु यावर्षी सकाळ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष तथा उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबीयांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे होणारा दिवाळी भेटीचा कार्यक्रम ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर रद्द करण्यात आल्याने शरद पवार यांना राजकारणातील विठ्ठल समजणाऱ्या राजकीय भक्तांनी यंदा आपल्या विठ्ठलाची भेट होणार नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

दिवाळीतील पाडव्यादिवशी बारामतीतील गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबीय राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहत असत. मात्र राजकीय घडामोडीनंतर यामध्ये बदल झाला. गोविंद बागेत शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी गेल्यावर्षी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह युवा नेते पार्थ पवार, जय पवार यांनी काटेवाडी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या होत्या.
दरम्यानच्या काळात, उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं मध्यंतरी निधन झालं. त्यामुळं यावर्षी पवार कुटुंबीयांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं गोविंद बागेत होणारा दिवाळी भेटीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलं आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर्षी दिवाळी साजरी होणार नसल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. कुटुंबातील दुःखद घटनेमुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
To Top