औसा - औसा-निलंगा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात बहिण भावाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई-वडिलांना आधार द्यायच्या वयात मुलांचा असा अकाली मृत्यू झाल्यामुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे औसा तालुका हादरून गेला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक माहिती अशी की, वाघोली येथील प्रसाद पद्माकर शिंदे (25) आणि त्याची बहीण गायत्री पद्माकर शिंदे (23) हे दोघे दुचाकीवरून लातूरला फॉर्म भरण्यासाठी जात होते. याच दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील देवयानी साडी सेंटरच्या जवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले आणि याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दोघांनाही चिरडले. या अत्यंत भीषण अपघातात सख्या बहीण -भावाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घडलेल्या या घटनेने शिंदे कुटुंबाचा आधार हरपला आहे. या घटनेमुळे वाघोली गाव शोकसागरात बुडालं आहे. अधिक तपास औसा पोलीस करत आहेत.