मोरगाव : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून हा संपूर्ण भाग बागायत करण्याची मनापासून काळजी घेतली. अनेक योजना आणल्या, पाणी आणले, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला; मात्र आजही शंभर टक्के बागायत शक्य झाली नाही, याची खंत मनात आहे,” अशा भावनिक शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मोरगाव येथे दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार यांनी मोरगाव परिसराचा दौरा केला. यावेळी मयुरेश्वर मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार म्हणाले, “जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी पुरंदर उपसा सिंचन योजना, जानाई-शिरसाई सिंचन योजना यांसारख्या योजना उभ्या केल्या. मोरगावसह परिसरातील गावांपर्यंत पाणी आणले. पाणी मिळाल्यानंतर उसासारखी पिके उभी राहिली आणि शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. मात्र, निसर्गाच्या लहरीपुढे अनेकदा माणसाचे प्रयत्न अपुरे पडतात.”
यंदाच्या पावसाळ्यात काही भागांवर एल निनोच्या परिणामामुळे पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून उभी केली पाणी योजना!
मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी केलेल्या संघर्षाचे कौतुक करताना पवार म्हणाले, “शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल २० लाख रुपये उभे करून पुरंदर उपसा सिंचन योजनेतून सुमारे तीन हजार फूट पाइपलाइन टाकली. त्यांच्या या प्रयत्नामुळे जवळपास ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकले आहे. हा केवळ पाण्याचा प्रश्न नाही; हा शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे.”
या पाइपलाइनसाठी आणखी निधी आवश्यक असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
‘संकट मोठं असलं तरी मार्ग काढावाच लागतो!’
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्याचे पवार यांनी सांगितले. काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अजूनही सर्व प्रश्न सुटलेले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
“संकट मोठं आहे. सगळ्या मागण्या शंभर टक्के मान्य झाल्या नाहीत. पण संकटातून मार्ग काढावाच लागतो. शेतकऱ्याला संकटात एकटं सोडता कामा नये,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
‘तुम्हाला जो रस्ता दाखवला आहे, त्या रस्त्याने नक्की जाल!’
यावेळी आगामी निवडणुकीबाबत थेट भाष्य करणे टाळत पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सूचक संदेश दिला.
“मला निवडणुकीबाबत काही बोलायचं नाही. मात्र, तुम्हाला जो रस्ता दाखवला आहे, त्या रस्त्याने तुम्ही नक्की जाल, याची मला खात्री आहे,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाला आणि भविष्यातील आशेला बळ दिले.
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना आणि पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करताना कार्यक्रमाला भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी युवा नेते युगेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, पोपट पानसरे, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय ढोले, दत्ता चव्हाण, चंद्रशेखर गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, तालुका सरचिटणीस ओंकार भोसले, सूर्यकांत तावरे, प्रदीप शेडकर, सागर मदने, सरपंच पोपट तावरे यांच्यासह पश्चिम भागातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
......

