बारामती : महसूल सेवक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय चतुर्थ वेतन श्रेणीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नागपूर येथील संविधान चौक येथे आमरण उपोषण सुरू झाले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामती तालुक्यातील सुमारे 38 महसूल सेवक सहभागी झाले आहेत.
महसूल सेवकांच्या आंदोलनाची आजपर्यंत शासकीय स्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या 60 वर्षापासून होत असलेली चतुर्थ वेतन श्रेणीची मागणी नाकारण्यात आली. ही मागणी जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत संविधान चौक नागपूर येथे बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. 25 दिवस आंदोलन सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महसूल सेवक रवींद्र बोदीले व योगेश शेडमाके अशा दोघांनी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यभरातील महसूल सेवकांसोबतच बारामती तालुक्यातील महसूल सेवकही धरणे आणि काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत चतुर्थ श्रेणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. महसूल सेवकांच्या आंदोलनामुळे दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या सेवा पंधरवडा उपक्रमावर परिणाम झाला, शेती पिकांचे पंचनामे, डिजिटल इ पीक पाहणी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले, उपलब्ध करून देणे सातबारा फेरफार वितरित करणे यासारखी कामे थांबली आहेत. सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. असा दावा बारामती तालुका महसूल सेवक संघटनेने केला आहे. ईव्हीएम मशीन स्कॅनिंग करणे, त्यांचे प्रेपरेशन करणे, निवडणूक साहित्याची पूर्वतयारी करणे ही सर्व कामे तोंडावर आले आहे. महसूल सेवकांचा संप चालू असल्याने प्रशासनाची धावपळ होणार असल्याचेही सांगण्यात आले.